8, Mar 2025
चित्रपट समीक्षा-पोस्टकार्ड | Movie Review-Postcard

चित्रपट – पोस्टकार्ड 

दिग्दर्शक – गजेंद्र अहिरे 

पटकथा लेखक- गजेंद्र अहिरे

निर्माता – विनय वामन गानू 

संगीतकार – गंधार संगोराम

आयएमडीबी रेटिंग – 7.7

               कल्पना करा की आपला एखादा मेसेज, निरोप किंवा आपण व्हॉट्सॲप वर जे संभाषण करतो, ते समोरच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आठ – दहा दिवसांचा कालावधी लागत असता तर? तसेच त्याच्या रिप्लाय बाबतही असते तर? खुप कठीण झाले असते नाही का? सध्या संदेश वहनाचं काम खूप सोप झालंय. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी कितीतरी साधनं आता उपलब्ध आहेत. पण पूर्वीच्या काळी केवळ पत्र हे एकच संपर्काचे माध्यम उपलब्ध होतं. आता पत्र म्हटलं की आपल्याला वाटेल की फक्त एखादा संदेश, निरोप किंवा खुशाली समोरच्याला कळवण. पण त्याकाळी पत्र आणि ते पोहोचवणारा पोस्टमन म्हणजे देवदूतच होता. पण इथं हे बोलण्याचं कारण म्हणजे नुकताच पाहिलेला गजेंद्र अहिरे दिग्दर्शित “Postcard” हा सिनेमा.. 

“शब्द.. शब्दाचं काय.. शब्द कायम गर्भार असतात..काय काय जन्माला घालतात..पण शब्दांची ओळख सोपी. दिसताना ते सोपे दिसतात…”

चित्रपटाची सुरुवातच पोस्टमन सायकलवरून पत्र वाटतोय अशी दाखवली आहे त्यासोबत मधुर पार्श्वसंगीत आणि वरील संवाद. Postcard हा सिनेमा आपल्याला तीन कथा सांगतो. या तीनही कथांना करुणेची झालर आहे या तीन कथांसोबतच त्या पोस्टमनची कथाही यामध्ये सुंदररित्या मिसळून जाते. 

           चित्रपटाचा काळ हा स्वातंत्र्योत्तर कालखंडातील आहे. त्या काळाला साजेशी अशी पात्रनिवड आणि त्यांचे पेहराव. पहिली कथा ही ‘भिकाजी कोंडिबा काळे’ या कोकणातील एका गावात लाकडाच्या वखारीत कामास असलेल्या पात्राभोवती फिरते. अगदी लहानपणापासूनच या वखारीत कामास असलेले हे आजोबा. उतार वयात सुना- नातवंडांच्यात जाण्याची अपेक्षा बाळगून असतात. त्याच्या नातवंडांसाठी त्याने एक लाकडी मुखवटा पण बनवलेला असतो जाताना नेण्यासाठी. आपल्या गावाकडे त्याचा पत्रव्यवहार सुरूच असतो. मात्र काही रकमेसाठी कपटी वखार मालकाकडे त्याच उर्वरित आयुष्य गहाण पडल्यासारखंच होतं. दरम्यान पैसे उभे करता येत नाही म्हणून देवाला पत्र लिहिणं त्यामध्ये त्या पोस्टमन च्या बायकोने मदत करणं. तरीही काही रक्कम बाकी राहणं व त्यातच त्या म्हाताऱ्याचा मृत्यू. त्याने मृत्यूपुर्वी देवाला लिहिलेल्या पत्रात यासाठी पोस्टमनलाच दोषी ठरवण. 

           दुसऱ्या कथेमध्ये पोस्टमनची बदली हिल स्टेशनला झालेली आहे. यामध्ये एका बापलेकीची कथा आहे. लिसा कांबळे या मुलीने आपल्या बापाला म्हणजेच जेम्स कांबळेला लिहिलेली पत्रे त्याच्यापर्यंत कधी पोहोचतच नाहीत. ती त्याच्यापर्यंत का पोहोचत नाहीत तसेच पोस्टमनला याही कथेतून मानहानी सहन करावी लागते. हे सर्व खूप सुंदररित्या या कथेतून दाखविले आहे. 

            तिसरी कथाही अशाच प्रकारे सुंदर रित्या दाखवण्यात आली आहे. यामध्ये एक गुलजार नावाची प्रेयसी त्याच्या प्रियकराला म्हणजच विश्वनाथ याला पत्र पाठवत असते. ती नाच गाणे करणारी आहे. तिच्या प्रियकराने तिला लवकरच यातून सोडवावे अशी तिची अपेक्षा आहे. परंतु प्रियकरही पैशांच्या अडचणीमुळे हतबल आहे. एका वैदू कडून इच्छापूर्ती करणारा मुखवटा ती खरेदी करते. आपल्या प्रियकरासाठी पैशांची तजवीज करण्याची इच्छा ती मुखवट्या समोर बोलून दाखवते. त्याप्रमाणे तिची ती इच्छा पूर्ण ही होते. मात्र तिचा प्रियकर मृत्यू पावतो. त्याच्या कंपनीकडूनच हे पैसे तिला भेटलेले असतात. या कथेतला घटनाक्रम अतिशय गूढ आहे. 

             तीनही कथा या रूपक कथा या प्रकारात मोडणाऱ्या आहेत. या तीनही कथांमध्ये रूपक म्हणून तो मुखवटा दाखवलेला आहे. मराठी कथा विश्वातले प्रसिद्ध लेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांमध्ये असलेली गूढता या चित्रपटामध्ये जाणवते. मात्र हा चित्रपट जी ए कुलकर्णींच्या कथेशी संबंधित नाही. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी हा चित्रपट खूप कलात्मक रित्या सादर केलेला आहे. तीनही कथांतील पात्रांना साजेसा अभिनय झालेला आहे. पोस्टमनच्या भूमिकेत असलेले गिरीश कुलकर्णी यांची व्यक्तिरेखा लक्षणीय आहे. तसेच चित्रपटातील सर्वच भूमिका गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, विभावरी देशपांडे, राधिका आपटे, सुबोध भावे, किशोर कदम, सई ताम्हणकर या आघाडीच्या कलाकारांनी साकारलेल्या आहेत.जवळपास दोन तास चालणारा हा चित्रपट मनावरची पकड कुठेच ढिली होऊ देत नाही. प्रत्येक कथेच्या शेवटपर्यंत उत्सुकता कायम ताणलेली राहते. तसेच पुढे काय होईल याचा जराही अंदाज लागत नाही.

              पत्रामध्ये केवळ शब्द नसतात. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे शब्द दिसायला सोपे वाटतात. पण त्यामागे असलेल्या भावना काय काय परिणाम करतात याचा कुणालाच अंदाज लागत नाही. त्यामुळेच असा हा कलात्मक चित्रपट पाहायलाच हवा. 

चित्रपटाविषयी अधिकचे: 

•२१ नोव्हेंबर २०१५ ला मराठी फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार पोस्टकार्ड ला मिळालेला आहे (एलिझाबेथ एकादशीसह).

टीप: हा चित्रपट आपण युट्यूब वरती देखील पाहू शकता.

Add Your Heading Text Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *